आलापल्ली–सिरोंचा NH-353C चे काम सहा वर्षांपासून रखडले : जुलैतील पाहणीनंतरही प्रगती नाही


- प्रशासनाच्या पाहणी व आश्वासनांनंतरही परिस्थिती जैसे थे; दोषी कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C गेल्या तब्बल सहा वर्षांपासून रखडल्याने नागरिकांच्या अडचणी कायम आहेत. जुलै महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी विविध समस्या सोडविण्याबाबत आश्वासने देण्यात आली होती. मात्र, पाहणीनंतरही कामात अपेक्षित वेगाने प्रगती झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, उपविभागीय अभियंता बोबडे तसेच संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी या मार्गाची पाहणी केली होती. या दौऱ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी रस्त्याची दयनीय अवस्था, अपूर्ण कामे, कामाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, उडणारी धूळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
मात्र, जुलैतील पाहणीनंतर बराच कालावधी उलटूनही रस्त्याच्या कामात ठोस बदल झालेला दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यांचा नेमका परिणाम काय झाला, तसेच पाहणीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कुठपर्यंत झाली, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डे, धुळीचा त्रास; रुग्णवाहिकांनाही अडथळे -
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. गरोदर महिला, रुग्ण, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सामान्य प्रवाशांना खराब रस्ता, खड्डे, धूळ आणि अपूर्ण बांधकामाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचविताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून प्रवास करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
सहा वर्षांनंतरही महामार्ग अपूर्ण का -
महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आता कामाच्या वेळापत्रकासह कंत्राटदाराच्या कार्यक्षमतेवर आणि कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सहा वर्षे उलटूनही काम पूर्ण झालेले नसताना संबंधित कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ का देण्यात आली? कामाच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी कोणत्या पातळीवर केली जात आहे? कामात विलंब झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी कामाची मागणी -
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना केवळ खड्डे बुजविणे, मुरूम किंवा GSB टाकणे अथवा तात्पुरती डागडुजी करणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गाचे काम निश्चित कालमर्यादेत, निर्धारित निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे ही संबंधित विभाग व कंत्राटदाराची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी -
महामार्गाच्या कामातील विलंब आणि कथित निकृष्ट दर्जाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे -
आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे. सहा वर्षांपासून दक्षिण गडचिरोलीतील जनता या परिस्थितीचा त्रास सहन करत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेची आणखी परीक्षा पाहू नये. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित मुदत जाहीर करून युद्धपातळीवर काम पूर्ण करावे अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
आरोग्य, शिक्षण, शेती आणि व्यापाराशी निगडित प्रश्न -
आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न हा केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून दक्षिण गडचिरोलीतील आरोग्य सेवा, शिक्षण, शेती, व्यापार, वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन रखडलेल्या कामाला गती देण्यासोबतच कामाच्या गुणवत्तेची तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




Petrol Price




