महत्वाच्या बातम्या

 बल्हारशाह रेल्वे स्थानकावर विदेशी दारूची अवैध वाहतूक उघड : १४ हजारांची दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वेने विदेशी दारूची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी उधळून लावला. बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे केरळ एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी पकडले. तिच्याकडून १४ हजार ५२२ रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या ८२ बाटल्या आणि ५०० रुपये किमतीची ट्रॉली बॅग असा एकूण १५ हजार २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शीतल संजय कंझर ४७ वर्षे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, गोवर्धना, ता. रिसोड, जि. वाशिम, सध्या रा. जलनगर, चंद्रपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडे फिकट गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ऑफिसर्स चॉईस कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ८२ प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी १७१ रुपये किमतीच्या या दारूची एकूण किंमत १४ हजार ५२२ रुपये आहे. अवैधरीत्या दारू बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे वर्धा येथे अप.क्र. ३२२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ६६ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ नोव्हेंबर रोजी जीआरपी पोलिसांना केरळ एक्सप्रेसच्या मागील जनरल डब्यातून एक महिला विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे तपासणी करून महिलेला मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदर कारवाई जीआरपी नागपूर चे पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जीआरपी वर्धाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांच्या नेतृत्वात पोअं अखिलेश चौधरी, पंकज भांगे, अश्विन पनेलवार यांनी केले.





  Print






Related Photos