महत्वाच्या बातम्या

 आरमोरी पोलिसांची धडक कारवाई : लोखंडी जॉक बल्ली चोरीचा छडा, अवैध दारू व सुगंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांविरोधात धडक कारवाई करत लोखंडी जॉक बल्ली चोरीचा छडा लावला असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध देशी दारू तसेच शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेल्या पाच लोखंडी जॉक बल्लीसह एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लोखंडी जॉक बल्ली चोरीचा छडा -
आरमोरी येथील आझाद चौक परिसरातील बांधकाम ठेकेदार दिमराज वसंत सपाटे यांनी सत्यसाई आदिवासी विकास संस्था, आरमोरी डी.एड. कॉलेजच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी लोखंडी जॉक बल्ली कामाच्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. दरम्यान, २२ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून पाच लोखंडी जॉक बल्ली चोरून नेल्या.

याप्रकरणी सपाटे यांनी २६ सप्टेंबर रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीचा छडा लावला.

तपासादरम्यान पोलिसांनी राजू माधव बाटबरई आणि टिकाराम तुळशीराम पत्रे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या पाच लोखंडी जॉक बल्ली, अंदाजे ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

६५० देशी दारूच्या बाटल्या जप्त -
दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ रोजी आरमोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात आली. मिथुन भाष्कर बन्सोड (रा. पोर्ला, ता. जि. गडचिरोली) हा ब्रह्मपुरी तालुक्यातून चोरीछुप्या मार्गाने मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकासमोर पोलिसांनी सापळा रचला. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ६५० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारूसह दुचाकी वाहन असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) व ९८ (२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई -
त्याच दिवशी आरमोरी पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरोधातही कारवाई केली. अमोल अनिल भुरसे (रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, जि. गडचिरोली) हा देऊळगाव ते ठाणेगाव मार्गावर दुचाकीवरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंगरगाव (भु.) जवळील पंजाबी ढाब्यासमोर मुख्य रस्त्यावर पाळत ठेवली. संशयित दुचाकीची झडती घेतली असता हिरो कंपनीची एमएच ३३ पी ८८८४ क्रमांकाची मोपेड आढळून आली. या वाहनाच्या डिकीमध्ये ईगल हुक्का शिशा तंबाखूची सीलबंद पाकिटे आढळून आली. तंबाखूसह दुचाकी असा एकूण ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, विक्रांत तळोले, पोलीस हवालदार बोरकुटे, पोलीस शिपाई झाडे, जगझापे व सराटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे तसेच पोलीस हवालदार गितेश्वर बोरकुटे, आरमोरी पोलीस ठाणे, करीत आहेत.





  Print






Related Photos