आनंदवनातील आनंद-निकेतन महाविद्यालय आर्थिक संकटात : व्यवस्थापन हस्तांतरणाचा निर्णय


- जीर्ण इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी १११ कोटींची गरज; २,५०० विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सक्षम संस्थेचा शोध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांच्या मानवतावादी कार्यातून उभ्या राहिलेल्या आनंदवनातील आनंद-निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयावर आर्थिक संकटाचे सावट आले आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून त्याठिकाणी नवीन, सुरक्षित आणि आधुनिक शैक्षणिक संकुल उभारणे आवश्यक झाले आहे. मात्र, या कामासाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम उभारणे सध्याच्या व्यवस्थापनाला शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद करण्याऐवजी त्याचा कारभार सक्षम संस्था किंवा व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महारोगी सेवा समितीने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक आणि सक्षम संस्थांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (स्वारस्य प्रस्ताव) मागविण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सहा दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य -
आनंद-निकेतन महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६४ रोजी झाली. स्थापनेपासून आजवर या महाविद्यालयाने वरोरा आणि परिसरातील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आनंदवनाच्या सामाजिक कार्याच्या परंपरेशी जोडलेले हे महाविद्यालय केवळ एक शैक्षणिक संस्था नसून परिसरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. सध्या येथे २,५०० हून अधिक विद्यार्थी आणि १०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या भवितव्याचा प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या रोजगाराशीही निगडित आहे.
जीर्ण इमारतीची दुरुस्ती शक्य नसल्याचे २००८ मध्येच स्पष्ट -
महाविद्यालयाची मुख्य इमारत १९६०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बांधण्यात आली होती. कालांतराने इमारतीची संरचनात्मक स्थिती गंभीर बनली. २००८ मध्ये संरचनात्मक अभियंत्यांनी केलेल्या पाहणीत इमारतीची विश्वासार्ह दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे मत नोंदविण्यात आले होते. यानंतरही इमारतीचा वापर सुरू राहिला. मात्र, आता विद्यार्थ्यांची संख्या आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता नवीन इमारत उभारणे अत्यावश्यक झाले आहे.
त्यातच आनंदवनापासून सुमारे २५ किलोमीटरच्या परिसरातील कोळसा खाणींमध्ये होणाऱ्या नियंत्रित स्फोटांमुळे गेल्या तीन वर्षांपासून भूगर्भीय कंपने जाणवत असल्याचे महारोगी सेवा समितीने नमूद केले आहे. त्यामुळे जीर्ण इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्याची गरज आणखी अधोरेखित झाली आहे.
१११ कोटींचा निधी उभारण्याचे प्रयत्न अपुरे -
नवीन शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी वास्तुविशारदाकडून अंदाजपत्रक मागविण्यात आले. त्यानुसार या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी उभारण्यासाठी माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, हितचिंतक तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. मात्र, अपेक्षित निधी उभा राहू शकला नाही.
दरम्यान, महारोगी सेवा समितीकडून आनंदवनात विविध मानवतावादी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांवर दरवर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने संस्थेवर आर्थिक ताण असल्याचे समितीने स्पष्ट केले आ महाविद्यालय बंद न करता हस्तांतरणाचा पर्याय आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय न घेता त्याचा शैक्षणिक प्रवाह अखंड सुरू ठेवण्यासाठी व्यवस्थापन हस्तांतरणाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सक्षम आर्थिक व प्रशासकीय क्षमता असलेल्या संस्थेने पुढे येऊन महाविद्यालयाची जबाबदारी स्वीकारावी, अशी समितीची भूमिका आहे.
यासाठी इच्छुक संस्थांकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राप्त प्रस्तावांचा विचार केल्यानंतर संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक मंजुरीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे
१११ कोटींचे काम; निधी उभारणे शक्य होणार नाही -
महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी सांगितले, महाविद्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीकरिता आर्किटेक्टकडून अंदाजपत्रक मागितले. १११ कोटींचे काम आहे. हा निधी गोळा करण्याचा प्रयत्नही केला. परंतु शक्य होणार नाही. व्यवस्थापनाने निर्णय घेतला. सक्षम व्यवस्थापन असलेल्या संस्थेकडून हस्तांतरण प्रस्ताव मागितले आहेत. त्यांच्या या भूमिकेतून महाविद्यालय बंद करण्यापेक्षा सक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
कार्यकारिणीच्या दोन्ही सभांमध्ये सर्वानुमते निर्णय -
महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी सांगितले, कार्यकारिणीच्या दोन सभा झाल्या. दोन्ही सभेमध्ये सर्वानुमते याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयाच्या भवितव्याबाबत व्यवस्थापन हस्तांतरणाचा निर्णय समितीने सर्वानुमते घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे -
आनंद-निकेतन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे गेल्यानंतर नवीन संस्था कोणत्या अटींवर जबाबदारी स्वीकारते, नवीन इमारतीचे काम कसे मार्गी लावले जाते आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे हित कसे सुरक्षित केले जाते, याला विशेष महत्त्व राहणार आहे.
बाबा आमटे यांच्या सेवाभावी कार्यातून उभ्या राहिलेल्या या महाविद्यालयाने सहा दशकांहून अधिक काळ ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अबाधित ठेवण्याचे आव्हान आता व्यवस्थापनासमोर आहे.




Petrol Price




