महत्वाच्या बातम्या

 पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना : मंत्री शंभूराज देसाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

ते म्हणाले, रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos