गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात : सहा ठार, सात गंभीर जखमी


- मजुरांना तेलंगणाला घेऊन जाणाऱ्या बोलेरोला भरधाव ट्रकची धडक; नागरा गावाजवळ वाहनाचा चुराडा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : रोजगारासाठी तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांच्या बोलेरो वाहनाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी ८ मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा गावाजवळ घडली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मृतांमध्ये आरुष मात्रे वय ३, किरण संतोष वैद्दे वय २६, संतोष मात्रे वय ३८, सुशिला मात्रे वय ३५, रुपसेन सतकार वय ३५ आणि ज्योती सतकार वय ३२ यांचा समावेश आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील विविध गावांतील रहिवासी आहेत.
जखमींमध्ये भुमेश्वर दुलीचंद मात्रे वय ४७, राजेंद्र पंचाल वय ३०, लक्ष्मी पंचाल वय २७, राकेश राजकुमार बाहे वय २४, संदीप रुपलाल बाहे वय ३४ यांच्यासह अन्य जखमींचा समावेश आहे. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
रोजगारासाठी तेलंगणाकडे निघाले होते मजूर -
प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लोडामा, पिंपळगाव, सावरी आणि पलेरा या गावांतील मजूर रोजगारासाठी तेलंगणातील जगतीहाल, करीमनगर येथे जात होते. सोमवारी ७ रात्री एकूण १३ जण बोलेरो वाहन क्रमांक एमपी-१५ टी-३४९ मधून तेलंगणाच्या दिशेने रवाना झाले होते.
मात्र, गोंदिया तालुक्यातील नागरा गावाजवळ रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.
गावकऱ्यांनी धाव घेत सुरू केले मदतकार्य -
अपघाताची तीव्रता लक्षात येताच नागरा परिसरातील गावकरी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. बोलेरोचा चुराडा झाल्याने त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज होती. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती.
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अपघातात पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू -
या अपघातात बालाघाट जिल्ह्यातील सावरी खुर्द येथील भुमेश्वर दुलीचंद मात्रे यांच्या कुटुंबावर दुहेरी आघात झाला. भुमेश्वर हे मिस्त्रीचे काम करतात आणि दरवर्षी रोजगारासाठी तेलंगणात जातात.
सोमवारी रात्री ते पत्नी सुशिला मात्रे आणि तीन वर्षांचा मुलगा आरुष यांच्यासह साथीदारांसोबत बोलेरोने तेलंगणाकडे निघाले होते. मात्र, नागराजवळ झालेल्या भीषण अपघातात सुशिला आणि चिमुकल्या आरुषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भुमेश्वर स्वतः गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोंदिया येथे उपचार सुरू आहेत.
मजुरांसोबत ठेकेदारही जखमी -
बालाघाट जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने मजूर रोजगाराच्या शोधात तेलंगणा आणि अन्य राज्यांकडे स्थलांतर करतात. याच पार्श्वभूमीवर लोडामा, पिंपळगाव, सावरी आणि पलेरा या चार गावांतील मजूर तेलंगणाकडे निघाले होते.
या मजुरांसोबत ठेकेदार संदीप बाहे हेही प्रवास करीत होते. अपघातात ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. रोजगारासाठी घराबाहेर पडलेल्या मजुरांच्या प्रवासाचा हा दुर्दैवी शेवट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भरधाव वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर -
गोंदिया-बालाघाट मार्गावर रात्रीच्या वेळी होणारी भरधाव वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपघातांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरा गावाजवळ झालेल्या या भीषण अपघाताने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची तसेच रात्रीच्या प्रवासात विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
रोजगाराच्या आशेने तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांचा प्रवास काळरात्रीत संपल्याने बालाघाटमधील त्यांच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.




Petrol Price




