कारवा- बल्लारशाह सफारी गेटचे उद्घाटन : वन्यजीव सप्ताहानिमित्त स्वच्छता मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मध्यचांदा वनविभागातील बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र कारवा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच कारवा-बल्लारशाह पर्यटन सफारी गेटचे उद्घाटन इको टुरिझम बोर्डचे सदस्य प्रकाश धारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला मध्यचांदा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) आदेशकुमार शेंडगे, बल्लारशाहचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. घोरूडे तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद सिडाम उपस्थित होते. सफारी गेटच्या उद्घाटनानंतर आलेल्या पर्यटकांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. पर्यटकांना कारवा सफारीच्या कॅपचेही वाटप करण्यात आले. यानंतर कारवा-बल्लारशाह पर्यटन सफारीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर तसेच १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने सफारी गेट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वनाधिकारी, वनकर्मचारी, वनमजूर, सफारीचे जिप्सीचालक व गाईड तसेच ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली.
यावेळी कारवा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्टडी टेबलचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. वन्यजीव सप्ताह व सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना वन, वन्यजीव संवर्धन, संरक्षण तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी मार्गदर्शनातून सांगण्यात आले.
कार्यक्रमाला कारवा गावातील पुरुष, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कारवा-बल्लारशाह सफारीचे जिप्सीचालक व गाईड तसेच बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनकर्मचारी आणि वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षेत्र सहाय्यक पठाण, रामसोच यादव, पोडचेलवार, टेकाम, उमरे, तसेच वनरक्षक येसांबरे, देवगडे, पवार, काळे, अनिल चौधरी, दोडके, दिलीप जाधव, हेपट, कस्तुरे, पर्वतकर, तिवाडे, टोंगे, सुधीर बोकडे, जेनेकर, गेडाम, मोहुर्ले, अंगलवार यांच्यासह सर्व वनरक्षक व रोजंदारी मजुरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.




Petrol Price




