२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा


- आयोजकांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र  राज्य किसान सभा व अखिल भारतीय आदिवासी महासभा द्वारा विविध मागण्यांसाठी २०  आॅगस्ट रोजी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयासमोर शेतकरी, शेतमजूर व जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा तसेच ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला डाॅ. महेश कोपुलवार, अॅड. जगदिश मेश्राम, देवराव चवळे, पुरूषोत्तम बांबोळे, संजय वाकडे, हंसदास मेश्राम, चंद्रभान मेश्राम, विलास भोपये, हिरालाल येरमे, प्रविण मेश्राम, सत्यवान उरकुडे, हरीदास पदा आदी उपस्थित होते. 
शेतकऱ्यांना  सरसकट कर्जमाफी द्या, जबरानजोत धारकांना घराचा व शेतजमिनीचा पट्टा त्वरीत द्या, वैयक्तीक सातबारा द्या, गैरआदिवासींकरीता असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करा, वयाच्या ६०  वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागिर आणि असंघटीत कामगारांना मासिक ५ हजार रूपये पेंशन लागू करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, पिकविता योजनेचा वापर करणाऱ्या  कंपन्यांऐवजी शेतकरी हितासाठी काम करा, शेतकऱ्यांना  नुकसानभरपाई द्या आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने १८, १९ आॅगस्ट ला वडसा येथे कार्यशाळा

 

शेतकऱ्यांच्या  विविध प्रश्नांतवर तसेच शेती क्षेत्रातील आर्थिक अरिष्ट समजून घेण्यासाठी येत्या १८  आणि १९  आॅगस्ट रोजी महाराष्ट्र  राज्य किसान सभेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळा वडसा येथील सिंधी भवनात आयोजित करण्यात आली आहे. 
कार्यशाळेचे उद्घाटन १८  आॅगस्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव तुकाराम भस्मे करतील. पहिल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शेतमजूर युनियनचे राज्य सचिव शिवकुमार गणविर, अ.भा. आदिवासी महासभेचे राज्य सचिव नामदेव कन्नाके, जि.प. सदस्य अॅड. लालसू नागोटी, जि.प. सदस्य सैनु गोटा, हाजी अब्दूल गणी शेख, भामरागड पं.स. चे सभापती सुखराम मडावी आदी उपस्थित राहणार आहेत. 
शेती क्षेत्रातील आर्थिक अरिष्ट या विषयावर अर्थतज्ञ व कृषी अभ्यासक डाॅ. प्रा. श्रीनिवास खांदेवाले व पिकविमा योजना आणि पाणी प्रश्न या विषयावर राजन क्षिरसागर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
१९  आॅगस्ट रोजी सकाळी १०  वाजता अ.भा. किसान सभेचे राष्टीय महासचिव अतुलकुमार अंजान यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी १२  वाजता विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-14


Related Photos