विठ्ठलभक्तीचा जागर : कौंडण्यपुरात वारकरी सेवेचा भक्तिमय सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आर्वी : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी भक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. कार्तिक प्रतिपदा अर्थात दहीहंडीच्या पावन पर्वावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेनिमित्त हजारो वारकरी, दिंड्या, टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण कौंडण्यपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्याच्या भावनेतून दिवंगत वामनराव दिवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुधीर दिवे व परिवाराच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत, सन्मान आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याच्या या उपक्रमाला यंदा १८ वर्षे पूर्ण होत आहेत. कौंडण्यपूरच्या या यात्रेला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे.
येथील श्री संत सदाराम महाराज दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेत असत. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांना पंढरपूरची वारी करणे शक्य झाले नाही. त्यानंतर प्रत्यक्ष विठ्ठलाने आपण कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला कौंडण्यपुरात येत असल्याचे सांगितल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या पवित्र पर्वावर प्रत्यक्ष विठ्ठलाचे वास्तव्य कौंडण्यपुरात असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
वारकऱ्यांसाठी चहा, सन्मान आणि महाप्रसाद -
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुक्कामी असलेल्या वारकरी व भाविकांसाठी चहावाटप करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांच्या सोयीसाठी मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भक्तिमय सोहळ्याला श्री संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज (देवनाथ मठ, अंजनगाव सुर्जी), संत सचिन देव महाराज आणि संत सयाजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.
रुक्मिणी मातेला १०० मीटरची साडी अर्पण -
यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे रुक्मिणी मातेसाठी सुरत येथील भक्तांकडून १०० मीटर लांबीची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या भक्तिमय सोहळ्यात भाविक, वारकरी बांधव आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुधीर दिवे यांनी केले आहे.




Petrol Price




