अंकिसा परिसरात माकडांचा धुमाकूळ : ग्रामस्थांमध्ये दहशत


- घरांची कौले फोडण्यासह अन्नधान्याची नासाडी; पादचाऱ्यांवरही हल्ले वाढले
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकडांचे टोळके थेट घरांच्या छतांवर धावून जाऊन कौलांची तोडफोड करीत आहे. त्यानंतर घरात प्रवेश करून फ्रीजमधील फळे, अन्नधान्य, भाज्या तसेच इतर खाद्यपदार्थांची नासाडी केली जात असल्याने नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
अंकिसा गावातील अनेक घरांच्या परिसरात माकडांचा वावर वाढला आहे. गावातील काही घरे गेल्या एक ते दीड वर्षापासून बंद असल्याने त्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. या ओसाड घरांमध्ये माकडांनी आपला ठिय्या मांडला असून, तेथूनच त्यांची टोळकी मानवी वस्तीत येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
फळझाडे व भाजीपाल्याची नासाडी -
घरांच्या अंगणात तसेच परिसरातील शेतांमध्ये लावलेली फळझाडे आणि भाजीपाल्याची पिके फुलोऱ्यावर किंवा उत्पादनाला येताच माकडांकडून फस्त केली जात आहेत. काही वेळा फळे व भाजीपाला खाण्यापेक्षा माकडांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस केली जात असल्याने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती वापरासाठी अंगणात लावलेल्या भाजीपाल्याचेही नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे घरांची दुरुस्ती, अन्नपदार्थांची नासाडी आणि पिकांचे नुकसान अशा विविध प्रकारे आर्थिक फटका बसत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
पादचाऱ्यांवरही चाल करून जाण्याचे प्रकार -
माकडांचा उपद्रव आता घरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सकाळच्या वेळी दुकानांकडे जाणाऱ्या तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर माकडे थेट चाल करून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वावरताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. माकडांचा बंदोबस्त वेळीच न झाल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अंकिसा येथील नागरिकांनी केली आहे.
जनजागृतीसोबत नागरिकांचे सहकार्य आवश्यक -
माकडांचा मानवी वस्तीत होणारा वावर रोखण्यासाठी वन विभागाच्या वतीने जनजागृती तसेच आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. माकडांना मानवी वस्तीकडे आकर्षित करणारे घटक कमी करण्यासाठी कचराकुंड्या नियमितपणे स्वच्छ ठेवणे, उष्टे अन्न उघड्यावर न टाकणे तसेच नागरिकांनी माकडांना अन्न देणे पूर्णपणे बंद करणे गरजेचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. माकडांचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यासाठी वन विभागातर्फे जनजागृती आणि उपाययोजना सुरू आहेत. कचराकुंड्या साफ ठेवणे, उष्टे अन्न उघड्यावर न टाकणे आणि नागरिकांनी माकडांना अन्न देणे बंद करणे गरजेचे आहे.




Petrol Price




