महत्वाच्या बातम्या

 तुकुम तलावात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश : ११ गोवंशांना जीवदान, १.७३ लाखांचा माल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशांच्या जीवावर उठलेल्या कत्तलीच्या धंद्याला रामनगर पोलिसांनी चाप लावत तुकुम तलाव परिसरात छापा टाकून ११ गोवंशांना जीवदान दिले. घरातच गोवंशांना कत्तलीसाठी डांबून ठेवून त्यांचे गोमांस विक्री केल्याचा प्रकार ४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. या कारवाईत गोमांसासह वजनकाटा, सत्तुर, लाकडी कुंडा व इतर साहित्य असा एकूण १ लाख ७३ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंद्रपूर शहरात अवैधरित्या गोवंशांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलिसांच्या शोध पथकाने अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तुकुम तलाव परिसरातील अब्दुल अनीस अब्दुल नबी कुरेशी (४६) आणि नफान अब्दुल अनीस कुरेशी (२१) यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. घरात गोवंशांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह छाप्याचे नियोजन केले.

४ ऑक्टोबर रोजी घराची झडती घेतली असता तेथे गोमांस तसेच गोमांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे सत्तुर, वजनकाटा, लाकडी कुंडा आदी साहित्य आढळून आले. याच ठिकाणी ११ नर गोवंश कत्तलीच्या प्रतीक्षेत डांबून ठेवलेले आढळले. पोलिसांनी या सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना जीवदान दिले. कत्तलीपूर्वीच पोलिसांच्या कारवाईमुळे या मुक्या जीवांचा जीव वाचल्याने परिसरात या कारवाईची चर्चा झाली.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ मधील कलम ५(क), ९, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमान्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, सुरज शेडमाके ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे





  Print






Related Photos