कापूस क्रांती प्रकल्पास कापूस विकास संचालक अरविंद वाघमारे यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कापूस उत्पादकता अभियान - कापूस क्रांती या योजनेंतर्गत कापूस प्रशिक्षण व क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीत भारत सरकारच्या कापूस विकास संचालनालयाचे संचालक अरविंद वाघमारे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
कारंजा तालुक्यातील माळेगाव (काळी) तसेच हिंगणघाट तालुक्यातील डायगव्हाण येथे कापूस प्रशिक्षण व क्षेत्रीय भेट शिवार फेरी आयोजित करण्यात आली. डायगव्हाण तसेच वाघोली येथील कापूस क्रांती प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकऱ्यांना कापूस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घन व अतिघन लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक अंतर्गत दोन महिला शेतकरी गटांना १०० टक्के अनुदानावर घन लागवड व अतिघन लागवड पद्धतीने कापूस पिकाचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करून संचालक अरविंद वाघमारे यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी कमी अंतरावर कापूस लागवड करताना कमी कालावधीच्या वाणाची निवड, पेरणीच्या वेळी खत व्यवस्थापन, रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण, कॅनोपी मॅनेजमेंटसाठी मॅपिक्वाट क्लोराईडचा योग्य वापर, गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, दोन वेचण्यांमध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक पीक व्यवस्थापन याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या योजनेमधील इतर घटकाच्या माध्यमातून कापूस पिकातील फरदड निर्मूलन, पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन आणि कॉटन श्रेडरच्या माध्यमातून कापूस अवशेषांपासून बायोचार निर्मिती करून त्याचा शेतीमध्ये उपयोग करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्रात्यक्षिकाचा लाभ घेतलेल्या काळे व चेडे यांच्या कापूस पिकाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या चिकट सापळे व फेरोमन सापळ्यांची पाहणी करून त्यामध्ये आढळलेल्या किडींच्या निरीक्षणांची नोंद घेण्यात आली. या क्षेत्रीय भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनातील अडचणी, पीक व्यवस्थापन व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर, तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार, मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा शेणवी, शुभ्रकांत भगत, तंत्र सहाय्यक विशाल वाघ, सहायक कृषी अधिकारी सुबोध मानकर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




