महत्वाच्या बातम्या

 डीपीसीचा पूर्वआढावा बैठक


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच रुजू झालेले जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी नियोजन सभागृह येथे शनिवारी सर्व यंत्रणांची डीपीसी पूर्वआढावा बैठक घेतले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, आदिवासी विकास विभागाचे सुनील बावणे, निलय राठोड आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे सर्व यंत्रणांनी प्राधान्याने सोडवावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, अनुपालन अहवालाबाबत सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण उत्तरे द्यावी. तसेच सन २०२२-२०२३ या चालू वर्षाचे सर्व प्रस्ताव विभाग प्रमुखांनी तयार ठेवावे. डीपीसी झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता देणे, वर्क ऑर्डर व इतर अनुषंगिक कामे त्वरित पूर्ण करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. डीपीसीतील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजे. यात कोणतीही चालढकल नको. ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता पूर्ण झाले पाहिजे, या दृष्टीने नियोजन करावे.
२०२२-२३ च्या प्रशासकीय मान्यताकरिता प्रस्ताव सादर करताना लागणारी कागदपत्रे परिपूर्ण असावीत. आयपास मध्ये प्रस्ताव पाठवताना अंदाजपत्रक, जागेची उपलब्धता व इतर अनुषंगिक बाबी तपासूनच मान्यतेसाठी पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी मागच्या बैठकीचे मुद्दे, अनुपालन अहवाल, सन २०२२-२३ चा झालेला खर्च आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे नियोजन आदींबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos