महत्वाच्या बातम्या

 मुलींच्या शिक्षणाला संरक्षणाची जोड : राजुऱ्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलींचे शिक्षण, सुरक्षितता, संरक्षण आणि सर्वांगीण विकास याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, पंचायत समिती राजुरा येथे १८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचे महत्त्व, त्यांचा मानसिक व आर्थिक विकास, शिक्षणाच्या समान संधी आणि मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळणे, त्यांचा आत्मविश्वास व मानसिक विकास होणे तसेच भविष्यात त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेकडे आणि संरक्षणाकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बाल संरक्षण यंत्रणेची रचना, बालकांच्या संरक्षणासाठी असलेले प्रमुख कायदे, शासनाच्या विविध योजना आणि बालकांच्या हक्कांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. समाजाच्या विकासात मुला-मुलींची भूमिका समान असून, प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता आणि विकासाची संधी मिळणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनातून स्पष्ट करण्यात आले.

यावेळी चाइल्ड हेल्पलाइन, महाराष्ट्रातील बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध हेल्पलाइन व सेवा, सखी वन स्टॉप सेंटरच्या सुविधा, बाल संगोपन योजना, बालकामगार व बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, दत्तक प्रक्रिया आणि अनाथ प्रमाणपत्र आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. संकटात सापडलेल्या बालकांना वेळेत मदत मिळण्यासाठी उपलब्ध यंत्रणांचा उपयोग करण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी अजय साखरकर, परिवेक्षक अधिकारी अतिश चव्हाण, बाल संरक्षण अधिकारी राकेश जिवतोडे, मीना भगत, निवृत्ता झाडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंकिता वनवे, हृदया संस्थेचे संजय खामणकर, मार्गदर्शक प्रिया पिंपळशेंडे, समुपदेशक भास्कर ठाकूर, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनचे पर्यवेक्षक, सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे तसेच हृदया संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रेम जरपोतवार यांची उपस्थिती होती. राजुरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल संरक्षण अधिकारी राकेश जिवतोडे यांनी केले. संचालन अंगणवाडी सेविका प्रज्वलीत दरेकर यांनी केले, तर आभार मीना भगत यांनी मानले. मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.





  Print






Related Photos