महत्वाच्या बातम्या

 जुनी पेन्शनसाठी शिक्षकांचा काळा मोर्चा


- शिक्षक दिनी भंडाऱ्यात शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मूक एल्गार; मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : एकीकडे संपूर्ण राज्यात शिक्षक दिन उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे शिक्षकांच्या हक्काच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शासनाच्या धोरणाविरोधातील असंतोष रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या नेतृत्वात ५ सप्टेंबर रोजी भंडारा शहरात शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढला. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने काढलेल्या या मोर्चातून शासनाचे लक्ष प्रलंबित मागण्यांकडे वेधण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.शिक्षक दिनाच्या दिवशीच काळ्या फिती आणि काळ्या मास्कच्या माध्यमातून व्यक्त झालेला निषेध हा जुन्या पेन्शनच्या निर्णयाकडे आशेने पाहणाऱ्या हजारो शिक्षकांच्या असंतोषाचे प्रतीक ठरला.

मूळ नियुक्ती दिनांकच ग्राह्य धरण्याची मागणी -
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासनाच्या नियमानुसार खासगी शाळांमध्ये वैध पद्धतीने नियुक्त झालेल्या अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आल्याचा फटका बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

शाळेला अनुदान कोणत्या टप्प्यावर मिळाले, हा निकष लावून संबंधित कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार झालेली असताना नंतर मिळालेल्या अनुदानाच्या टप्प्यामुळे त्यांच्या पेन्शनच्या अधिकारावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

त्यामुळे अनुदानाचा टप्पा हा निकष बाजूला सारून कर्मचाऱ्यांचा मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली.

समान परिस्थितीत समान न्याय ची मागणी -
आंदोलनादरम्यान संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांनी शासनाच्या धोरणातील कथित विसंगतीवर प्रश्न उपस्थित केला. ग्रामविकास विभागात २००५ पूर्वीची भरतीची जाहिरात असल्यास त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो, मग शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळा निकष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

समान परिस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे निकष लावून न्याय देऊ नये. समान परिस्थितीत समान न्याय या तत्त्वाचा अवलंब करून शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शनचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

काळ्या फितीतून शासनाला संदेश -
शिक्षक दिन हा शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस असताना याच दिवशी शिक्षकांनी काळ्या फिती व मास्कच्या माध्यमातून निषेध नोंदविल्याने आंदोलनाचे वेगळेच गांभीर्य अधोरेखित झाले. घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित नसून अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याशी निगडित असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा -
या मूक मोर्चाला विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये शिक्षक भारती, राज्य सरकारी-निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समिती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, राज्य मध्यवर्ती संघटना, विजुक्ता, विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघ आणि कायम विनाअनुदानित कृती समिती यांच्यासह अन्य संघटनांचा समावेश होता.

विविध संघटनांच्या सहभागामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे. आता शासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos