कनेली येथे नवनिर्मित सभागृहाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते लोकार्पण : गावकऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : कनेली येथील गोटूल परिसरात नवनिर्मित सभागृहाचे लोकार्पण आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासात त्याची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचा विश्वास आमदार नरोटे यांनी व्यक्त केला.
सभागृहाच्या लोकार्पणानंतर आमदार डॉ. नरोटे यांनी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, स्थानिक अडचणी आणि विकासकामांबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांची तत्काळ दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणे, त्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे आपले कर्तव्य आहे. गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभाग आणि ग्रामस्थांशी सातत्यपूर्ण संवादातूनच शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीदरम्यान आमदार नरोटे यांनी गावकऱ्यांसोबत एकत्र बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला. ग्रामस्थांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत, दाखवलेली आपुलकी आणि व्यक्त केलेला विश्वास याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच समाजकार्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष साजणजी गुंडावार, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, विजयजी कुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाशजी गेडाम, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, युवा नेते पवनजी येरमे, श्रीनिवासजी दुल्लमवार, नगरसेवक मल्लिक बुधवानी, कालिदासजी लेंगगुरे, अभिजितजी गाईन, कलिरामजी राऊत, युवा नेते अविनाशजी पोरेटी, उपसरपंच शेपुजी उसेंडी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




