ट्रकला मागून दुचाकीची धडक : २४ वर्षीय रोहन डोंगरेचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील रेल्वे चौकाजवळ घडली. रोहन सुधाकर डोंगरे २४ वर्ष, रा. इंदिरानगर, गडचांदूर, जि. चंद्रपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच ४० एके ३८२९ हा राजुराच्या दिशेने जात होता. त्याचवेळी दुचाकी क्रमांक एमएच ३४ बीयू ८३३४ वरून रोहन डोंगरे हा जुन्या बसस्थानकाच्या दिशेने जात होता. दरम्यान, रेल्वे चौकाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पुढे चाललेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रोहन याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.




Petrol Price




