आरसेटीच्या प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला चालना द्या : राजेंद्र भुयार


- प्रशिक्षणानंतर व्यवसायाच्या संधींचा पाठपुरावा करून आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (आरसेटी) प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरसेटीमधील प्रत्येक प्रशिक्षण हे व्यवसायाभिमुख असून, प्रशिक्षणामुळे ज्ञानासोबतच व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने व्यवसायाच्या संधींचा पाठपुरावा करून स्वतःचा रोजगार उभारावा आणि आर्थिक परिस्थिती भक्कम करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले.
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारच्या प्रायोजित आणि बँक ऑफ इंडिया संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), गडचिरोली येथे आरसेटी आणि भारत ग्रामीण जीवनोन्नती फौंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत ढोंगळे, महसूल विभागातील तहसीलदार (रोहयो) वनिशाम येरमे, भारत ग्रामीण जीवनोन्नती फौंडेशनचे राहुल इंगोले, आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम कुनघाडकर तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन -
कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी उपलब्ध योजनांचा अभ्यास करून त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तहसीलदार वनिशाम येरमे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील विविध संधींचा प्रभावी वापर करून कृषी उत्पादनातून आर्थिक प्रगती साधावी आणि लखपती शेतकरी निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत ढोंगळे यांनी स्वयंरोजगाराचे महत्त्व अधोरेखित केले. कोणतेही काम करण्यास कमीपणा न मानता आपल्या श्रमाला योग्य दिशा देऊन स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त सहभाग -
सहा दिवस चाललेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी, उद्योजकतेची कौशल्ये आणि उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचा अनुभव सांगताना अर्चना तलांडे आणि अबिद अली शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणामुळे व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग भविष्यात स्वयंरोजगार उभारण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून भारत ग्रामीण जीवनोन्नती फौंडेशनचे राहुल इंगोले यांनी संस्थेच्या कार्याची आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण -
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसाय उभारण्यासाठी उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले.




Petrol Price




