महत्वाच्या बातम्या

 तलावाकाठच्या गाळपेर जमिनीवर चारा लागवडीसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तलावातील पाणीपातळी कमी झाल्यानंतर तलावाकाठची खुली होणारी गाळपेर जमीन चारा बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हास्तरीय निवड समिती व गठित करण्यात येणार असून. इच्छुक पात्र लाभार्थ्यांची निवड करून चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणा करिता लाभार्थी निवड समन्वय व सहनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभा कक्षामध्ये घेण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विलास गाडगे, सहाय्यक आयुक्त डॉ.प्रशांत गेडाम, उपकार्यकारी अभियंता दर्पण नागदेवे, जिल्हा मृदू व संवर्धन व मृद चाचणी अधिकारी वृषाली देशमुख यांची उपस्थिती होती.

जलसंधारण विभागाकडून तलावांच्या गाळपेर क्षेत्रात चारा बियाणे लागवड करण्याबाबत शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित तलावांच्या परिसरातील गायरान क्षेत्रावर चारा लागवड करण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.

केवळ चारा लागवडीसाठीच जमिनीचा वापर तलावाकाठची उपलब्ध गाळपेर जमीन केवळ चारा बियाणे लागवडीसाठीच वापरणे बंधनकारक राहणार आहे. या जमिनीचा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी वापर करता येणार नाही. तसेच, एका लाभार्थ्याला किती क्षेत्र उपलब्ध करून द्यायचे, याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत घेण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे तलावांच्या पाणीपातळीत घट झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जमिनीचा चारा उत्पादनासाठी उपयोग होणार असून, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी अर्ज मागविणे, छाननी व लाभार्थी निवड प्रक्रिया समन्वयाने आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.





  Print






Related Photos