महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत मसण्या उद चा दुर्दैवी मृत्यू : वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पाम सिव्हेट (मसण्या उद) या वन्यप्राण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जंगलाकडे जात असताना  Habitat Conservation Society चे सदस्य यश सोनुले आणि कल्पित सोरटे यांना हा वन्यप्राणी रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

अपघातात वाहनाचे चाक पाम सिव्हेटच्या तोंडावरून आणि पोटावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने हा प्राणी रस्त्यावर वेदनेने तडफडत होता. संस्थेच्या सदस्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर  येथे नेण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविकास महामंडळाला  देण्यात आली आहे.

Habitat Conservation Society ही संस्था मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीवांच्या रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद व दस्तऐवजीकरण करीत आहे. बाबुपेठ–जुनोना मार्गावर यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. या मार्गावरील वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सांगितले.

या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन संस्थेने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन बाबुपेठ–जुनोना–पोंभुर्णा–चिंचपल्ली या जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गावर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक उभारणे, वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करणे, सूचना फलक लावणे तसेच वन्यजीवांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी शास्त्रीय पद्धतीने सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली होती.

या उपाययोजनांमुळे वन्यजीवांचे अपघात रोखण्यासोबतच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितताही सुनिश्चित होऊ शकते. जंगलातून जाणारे रस्ते हे केवळ वाहतुकीचे मार्ग नसून वन्यजीवांच्या अधिवासाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि नागरिक या दोघांच्याही सुरक्षेचा विचार करून संबंधित विभागांनी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आणखी किती निष्पाप वन्यजीवांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.





  Print






Related Photos