महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांकडून वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२० वैयक्तिक शेततळे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एक शेततळ्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

शेततळ्याकरीता मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्याची निवड होईल. ऑनलाईन अर्ज हा मोबाईल, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. यासाठी २३ रुपये ६० पैसे शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. त्यामधून निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ७/१२, ८/अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेराक्स, हमीपत्र, जातीचा दाखला महाडीबीटीवर विहीत मुदतीत अपलोड करावा लागेल.

निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी अधिकारी भेट देतील तसेच कागदपत्र छाननीअंती पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करण्यात येतील. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी यापुर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे, सामुहिक शेततळे या घटकाकरीता लाभ घेतलेला नसावा.

महाडीबीटी प्रणालीवर एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज येतात. त्यामुळे ज्यांची निवड झाली ते वगळून उर्वरित शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी लावली जाते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने त्यांची निवड केली जात असल्यामुळे प्रत्येकवेळी सबंधित शेतकऱ्यांनी अर्ज करावयाची आवश्यकता नाही, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी कळविले आहे. 





  Print






News - Wardha




Related Photos