महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठ परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक २०२२ करीता विद्यापीठात मतदान प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /अमरावती : २० नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होणा­ऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेची निवडणूकीची तयारी सुरु असताना या निवडणूकीच्या संदर्भात असणा­ऱ्या तांत्रिक बाबींबद्दल तंत्रशुद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी यांच्याकरीता मतदान प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव (आस्था) मंगेश वरखेडे व प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे उपस्थित होते.
कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिया निर्विवाद, निरपेक्ष आणि पारदर्शकतापूर्ण व्हावी, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिले. ते पुढे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया ही संवेदनशील असल्याने सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी मनुष्यबळ प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. सदर निवडणूक ही बॅलेट पेपरने होत असल्यामुळे अधिक जबाबदारीने आणि जास्तीतजास्त मतदान वैध कसे होईल, याबाबत मार्गदर्शन केले. सदर निवडणूकीमध्ये असणारा मतदार हा पदवी, पदवीधर व शिक्षकी पेशा मधील असल्यामुळे सदर निवडणूक आदर्श पद्धतीने होईल, असा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू तथा प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करुन सदर निवडणूकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा व आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन केले. याप्रसंगी प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे यांनी पी.पी.टी. द्वारे उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देवून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन उपकुलसचिव (आस्था) मंगेश वरखेडे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयांतील सर्व मतदान केंद्राधिकारी व मतदान अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos