महत्वाच्या बातम्या

 दुचाकींच्या पेट्रोल टाकीतून दारूची तस्करी उघड :२.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त


- गडचिरोली पोलिसांची कारवाई; दोन तरुण ताब्यात, धानोरा तालुक्यात १,५०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त
 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अवैध दारू वाहतूक आणि निर्मितीविरोधात गडचिरोली जिल्हा पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दुचाकींच्या पेट्रोल टाक्या आणि सीट कव्हरमध्ये विशेष बदल करून त्यातून दारूची तस्करी करण्याचा प्रकार गडचिरोली पोलिसांच्या नाकाबंदी पथकाने उघडकीस आणला. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धानोरा तालुक्यातही पोलिसांनी जंगल परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून १,५०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त केला. या कारवाईत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पेट्रोल टाकी आणि सीट कव्हरमध्ये लपवली दारू -
गडचिरोली पोलिसांच्या नाकाबंदी पथकाकडून शहरात वाहनांची तपासणी सुरू असताना दोन दुचाकी संशयास्पद आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी दुचाकींच्या पेट्रोल टाक्या आणि सीट कव्हरमध्ये विशेष बदल करून त्यामध्ये दारू लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

तानाजी नानाजी पेंदोरकर २६ वर्ष आणि सौरभ प्रकाश महाजनवार १८ वर्ष, दोघेही रा. व्याहाड, ता. सावली, जि. चंद्रपूर अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोलीकडे दारूची वाहतूक करण्यासाठी या दुचाकींचा वापर केला जात होता.

पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी दुचाकींच्या रचनेत बदल करून दारू लपविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र, नाकाबंदी पथकातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा प्रयत्न उधळण्यात आला. पोलिसांनी दोन्ही दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रुपेश दरो, पोलिस शिपाई विजय जरांडे आणि प्रदीप मेश्राम यांनी केली.

धानोरा तालुक्यात दारू अड्ड्यांवर धाडसत्र; चार गुन्हे दाखल -
धानोरा अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धानोरा पोलिसांनीही जंगल परिसरात धडक मोहीम राबविली. १६ ऑक्टोबर रोजी मौजा चिंगली, रांगी आणि वानरचुवा येथील जंगल परिसरात छापे टाकून तब्बल १,५०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला. या कारवाईत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करून १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी धानोरा पोलिसांकडून सातत्याने शोधमोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत चिंगली टोला येथे करण्यात आलेल्या कारवाईत राधाबाई लोलु कल्लो ६० आणि लिलाबाई माणिकराव कल्लो ५५ वर्ष यांच्याकडून मडक्यांमध्ये साठवून ठेवलेला मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे १० हजार आणि ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

त्यानंतर रांगी येथील शेतशिवारात कडुलिंबाच्या झाडाखाली लपवून ठेवलेला ४० हजार रुपये किमतीचा ४०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला. या प्रकरणात संजय मारुती कुमोटी ५० वर्ष याच्यावर कारवाई करण्यात आली असून, संतोष मारुती कुमोटी ३५ वर्ष, रा. रांगी या संशयिताचा शोध सुरू आहे.

वानरचुवा जंगल परिसरात ९५० लिटर सडवा हस्तगत -
धानोरा पोलिसांनी वानरचुवा येथील जंगल परिसरात शेतालगतच्या बोळीत लपवून ठेवलेला २५ हजार रुपये किमतीचा ९५० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त केला. याप्रकरणी तरणदास जयदेव कुमोटी ३६ वर्ष, रा. वानरचुवा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चारही कारवायांमध्ये एकूण पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम तीव्र गडचिरोली शहरात दुचाकींच्या पेट्रोल टाक्या आणि सीट कव्हरमध्ये बदल करून दारूची वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला, तर धानोरा तालुक्यात जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाचा सडवा लपवून ठेवल्याचे समोर आले. या दोन्ही कारवायांमुळे जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक आणि निर्मिती विरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहनांची तपासणी, संशयास्पद ठिकाणांवर छापे आणि दुर्गम जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यावर पोलिसांकडून भर दिला जात आहे. त्यामुळे अवैध दारू व्यवसायात सहभागी असणाऱ्यांवर कारवाईचा दबाव वाढला आहे.





  Print






Related Photos