दुष्काळग्रस्त पशुपालकांना दिलासा : मोहर्लीत मोफत चारा वाटप केंद्र सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून मोफत चारा वाटप केंद्र सुरू करण्यात आले आहे. मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात ५ नोव्हेंबर रोजी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, जनावरांच्या चाऱ्यासाठी होणारी भटकंतीही थांबण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे उपसंचालक विशाल माळी, सहाय्यक वनसंरक्षक संकेत वाटोरे, मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्यासह मोहर्ली, जुनोना, भामडेळी, सितारामपेठ, कोंडेगाव, मुधोली, टेकाडी, अडेगाव, आगरझरी आणि देवाडा येथील सरपंच, पोलीस पाटील, इको विकास समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, सितारामपेठ येथील महिला, पर्यटन व्यवस्थापक, मार्गदर्शक आणि पीआरटी सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व वनक्षेत्रांमध्ये अशा प्रकारची चारा वाटप केंद्रे उभारून पशुपालक आणि शेतकऱ्यांना मोफत चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. वनक्षेत्रातील अग्निरेषांवर असलेले गवत जाळण्याऐवजी ते संकलित करून स्थानिक पशुपालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा योग्य वापर होण्यासोबतच दुष्काळी भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे, चाऱ्याच्या शोधात पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास वन्यप्राण्यांशी होणारा संपर्क टाळता येईल. परिणामी पशुधनाची हानी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे. केवळ चारा उपलब्ध करून देणारा नव्हे, तर शेतकरी, पशुपालक आणि वन्यजीव या तिन्ही घटकांच्या सुरक्षेला हातभार लावणारा हा उपक्रम ठरणार आहे.




Petrol Price




