महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्या पशुमालकावर दंडात्मक कारवाई


- हिंगणा नगरपंचायतीची धडक मोहीम; ४ हजारांचा दंड वसूल, दोन जनावरे परत

विदर्भ नव एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि अस्वच्छता पसरविण्याच्या प्रकाराची दखल घेत हिंगणा नगरपंचायतीने पशुमालक स्वप्निल मते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत त्यांच्या मालकीची दोन जनावरे ताब्यात घेऊन निलडोह येथील राईज पशुपालन केंद्रात जमा करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वारंवार नोटिसा देऊनही जनावरे रस्त्यावर -
सार्वजनिक रस्ते आणि चौकांमध्ये जनावरे बांधल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याशिवाय परिसरात अस्वच्छता पसरून नागरिकांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर हिंगणा नगरपंचायतीकडून संबंधित पशुमालकाला वारंवार नोटिसा देऊन रस्त्यावरील जनावरे हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसा देऊनही जनावरे न हटविल्याने नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.

मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई -
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांच्या निर्देशानुसार स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकात अतुल धरपाल जोडारी, सचिन कोकाटे, गोपाल नकडे, भैयाजी जानकटे आणि नारायण या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

पथकाने स्वप्निल मते यांच्या मालकीची दोन जनावरे ताब्यात घेऊन निलडोह येथील राईज पशुपालन केंद्रात जमा केली. त्यानंतर संबंधित पशुमालकाकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लेखी हमीपत्र घेतल्यानंतर जनावरे परत -
भविष्यात सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधणार नाही, असे लेखी हमीपत्र संबंधित पशुमालकाकडून घेण्यात आले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली दोन्ही जनावरे त्यांना परत करण्यात आली.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन -
नागरिकांनी आपली जनावरे सार्वजनिक रस्ते आणि चौकांमध्ये बांधू नयेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासोबतच परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा हिंगणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांनी दिला आहे.





  Print






Related Photos