महत्वाच्या बातम्या

 वियानी कॉन्व्हेन्टजवळ दुचाकीची धडक : रेल्वे लोकोपायलट जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मुलांना कराटे क्लाससाठी वियानी कॉन्व्हेन्ट येथे घेऊन जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या रेल्वे लोकोपायलटला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बल्लारपूर शहरात घडली. या अपघातात लोकोपायलटच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला व पोटरीला दुखापत झाली. हर्षकुमार वाल्मीक म्हस्के ४५ वर्ष रा. डॉ. आंबेडकर वार्ड, बल्लारपूर हे ताडाळी येथे रेल्वे लोकोपायलट म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या दोन्ही मुलांना कराटे क्लाससाठी वियानी कॉन्व्हेन्ट येथे घेऊन गेले होते.

नगरपरिषदेच्या लाईनजवळ चायनीज दुकानासमोर मोपेड उभी करून ते मुलांसोबत रस्ता ओलांडत असताना एमएच ३४ ए.डब्ल्यू. ५८७३ क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकीने त्यांना धडक दिली. धडकेनंतर म्हस्के यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना चालण्यास त्रास होत आहे. अपघातानंतर दुचाकी चालकाने शिवीगाळ केल्याचेही म्हस्के यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या मार्गावर विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





  Print






Related Photos