विषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू


- बुवाबाजीच्या नादात उपचारास लागला वेळ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या व भामरागड तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या मरकनार गावातील शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पेका बोळंगा दुर्वा (५८) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 
शेतकरी पेका हा शेतीच्या कामासाठी काल १९ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेतात गेला होता. काम करत असताना त्याला सापाने दंश केला. त्याने माहिती देताच त्याच्यावर बुवाबाजीचा प्रयत्न करून विष उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्येच वेळ गेल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याची ३ ते ४  तास मृत्यूशी झुंज सुरू होती. या गावातून भ्रमणध्वनीसुध्दा लागत नाही. प्रकृती खालावल्यानंतर त्याला खांद्यावर घेवून मरकनार येथून नाल्याच्या घाटापर्यंत आणण्यात आले. नाल्याच्या दुसऱ्या बाजूस रविंद्र पडालवार यांचे वाहन होते. या वाहनात टाकून त्याला भाममरागड येथे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आधीच वेळ घालवल्यामुळे जवळपास रात्रीचे ७.३०  वाजले होते. यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. 
कोठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही. यामुळे ८ ते १० गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच या गावांमध्ये जाण्यासासाठी योग्य मार्गसुध्दा नाही. गावामध्ये वाहन जावू शकले असते तर त्याच्यावर उपचार होवू शकला असता. परिसरात भ्रमणध्वनी सेवा असती तर १०८ क्रमांकाची रूग्णवाहिकासुध्दा पोहचू शकली असती. या सोयी सुविधांचा अभाव आणि बुवाबाजीवर असलेली श्रध्दा या भागातील नागरिकांसाठी जिवघेणी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोठी आरोग्य केंद्राचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. यामुळे बांधकाम पूर्ण करावे आणि  या आरोग्य केंद्रात कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-20


Related Photos