महत्वाच्या बातम्या

 माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांकडून जप्त


- टव्वे जंगल परिसरात विशेष अभियान; ११ कुकर, ३ किलो गनपावडर, डेटोनेटरसह मोठा साठा हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात माओवाद्यांचा प्रभाव संपुष्टात आल्यानंतर आता नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यावर गडचिरोली पोलीस दलाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष शोध अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे कुकर, गनपावडर, डेटोनेटर, वायर, बॅटरी, सोलर प्लेटसह विविध माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी माओवादी संघटनांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी तसेच घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा आणि स्फोटक साहित्याचा वापर केला जात होता. आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवादी हे साहित्य तयार करून गोपनीयरीत्या जमिनीत पुरून ठेवत असत. माओवादी सप्ताह, निवडणुका आणि अन्य महत्त्वाच्या प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात घडविण्यासाठी या साहित्याचा वापर करण्याचा त्यांचा उद्देश होता.

दरम्यान, माओवाद्यांनी गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ४ नोव्हेंबर रोजी विशेष शोध अभियान आखण्यात आले. यासाठी गडचिरोली येथील विशेष अभियान पथक आणि प्राणहिता येथील चार तुकड्या तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दोन पथकांना संबंधित जंगल परिसरात रवाना करण्यात आले.

विशेष अभियान पथकांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी बीडीडीएसच्या जवानांनी संशयित ठिकाणांची कसून तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य आणि अन्य माओवादी सामग्री आढळून आली. हे साहित्य सुरक्षितरीत्या हस्तगत करण्यात आले.

जप्त केलेल्या साहित्याचा तपशील -
या कारवाईत पुढील साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे ११ कुकर, कॉर्टेक्स वायरचे ३ बंडल (प्रत्येकी १०० फूट), ३ किलो गनपावडर, ४ डेटोनेटर, १२ व्होल्टची १ बॅटरी, २५० ग्रॅम फटाका बारूद, ४ स्टील कंटेनर, वायरचे ८ बंडल, १ सोलर प्लेट इतर माओवादी साहित्य

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई -
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी ही मोहीम यशस्वी केली.

या कारवाईत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले आहे.

माओवादमुक्त जिल्ह्यात सुरक्षिततेवर भर -
माओवाद्यांनी भूतकाळात घातपाताच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले साहित्य शोधून निष्क्रिय करणे आणि नागरिकांसह सुरक्षा दलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, याला पोलीस दलाकडून प्राधान्य दिले जात आहे. माओवादाचा प्रभाव संपुष्टात आल्यानंतरही दुर्गम जंगल परिसरात शिल्लक असलेल्या धोकादायक साहित्याचा शोध घेण्यासाठी अशा मोहिमा महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या कारवाईमुळे संभाव्य घातपाताचा धोका टाळण्यास मदत होणार असून जिल्ह्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.





  Print






Related Photos