आरमोरीत दुर्गा उत्सवात पहायला मिळणार ‘ग्लोबल वॉर्मिंग - सेव्ह द अर्थ’ ची प्रतिकृती


- ग्लोबल वाॅर्मिंगबाबत करणार जनजागृती
- आरमोरीतील प्रसिध्द दुर्गा उत्सवात उसळणार भाविकांचा जनसागर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी  / आरमोरी :
दुर्गा उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या आरमोरी शहरात यावर्षी ग्लोबल वाॅर्मिंगच्या जागतिक समस्येवर प्रकाश टाकणारा देखावा साकारला जात असून जुन्या बसस्थानकाजवळील नवदुर्गा उत्सव मंडळ यावर्षी ‘‘ग्लोबल वॉर्मिंग - सेव्ह द अर्थ’ चा संदेश देणार आहे. या भव्यदिव्य प्रतिकृतीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात आरमोरीतील दुर्गा उत्सव प्रसिध्द आहे. शहरात  दरवर्षी नवनविन प्रतिकृती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात येतात. यावर्षीची ही प्रतिकृती भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत आरमोरी शहरात साकारण्यात आलेल्या सर्व प्रतिकृतींपेक्षा ही प्रतिकृती वेगळी असणार आहे. 
नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील ३९ वर्षांपासून निरनिराळ्या राज्यातील प्रसिध्द प्रतिकृती उभारतात. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक प्रतिकृतीत वेगळेपणा व आकर्षण असते. येथील नवरात्र उत्सव पाहण्यासाठी विदर्भातीलच नाही तर वेगवेगळ्या राज्यातील भाविक येत असतात. यावर्षी साकारण्यात येत असलेली ग्लोबल वार्मिंग - सेव्ह द अर्थ ही जगाला संदेश देणारी प्रतिकृती १० हजार स्क्वेअर फुटात राहणार असून उंची ४५ ते ५० फुट असणार आहे. 
यापूर्वी या मंडळाने माॅ बम्लेशवरी, अमरनाथ पंचतत्व, शेगाव - शिर्डी, सपनोका महल, पाताल भैरवी, चारधाम, पद्मनाभम, द्वारका, मथुरा, वृंदावन, अष्टविनायक, सत्यम - शिवम - सुंदरम, सर्वधर्म समभाव, तिरूपती बालाजी, तनोट माता, पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा, वैष्णोदेवी आदीसहीत अनेक प्रतिकृती साकारल्या आहेत. 
यावर्षी जगासमोरील सर्वात मोठे संकट असेलेले ग्लोबल वाॅर्मिंग. जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत असल्यामुळे अनेक नैसर्गिक गोष्टी नष्ट होत आहेत. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित गोष्टी याला कारणीभूत आहेत. हरीतगृह निर्मिती हे जागतिक तापमान वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. कारखाण्यांसोबतच वाहनांमधून सोडल्या जाणार्या काॅर्बन डायआक्साईड व इतर वायुमुळे गेल्या काही वर्षांत ग्लोबल वाॅर्मिंग दहा पटींनी वाढले आहे. तसेच दुसरे प्रमुख कारण म्हणजे ओझोनच्या स्तराचे प्रमाण कमी होणे. पृथ्वीला वातावरणाभोवती ओझोनचा स्तर असतो. जो सूर्याचया अतिनिल किरणांना पृथ्वीवर येण्यापासून थांबविते. त्यामुळे अतिनिल किरणे पृथ्वीवर येउन तापमानात वाढ होत आहे. तापमानवाढीमुळे ऋतुमानातही बदल होत आहेत. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे वृक्षतोड थांबवून वृक्षसंगोपन करणे हे आहे. तापमान वाढ होतच राहिल्यास येत्या ५० वर्षात सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही, असे या प्रतिकृतीतून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
प्रतिकृतीत सर्वप्रथम भाविकांना प्रवेशद्वाराजवळ जंगलतोड करून नका हा संदेश असलेला देखावा दिसणार आहे. प्रवेशद्वाराच्या वर पृथ्वी असून एक मनुष्य पृथवीला वाचवा असा संदेश देताना दिसणार आहे. पुढे गेल्यानंतर एक मानव रानटी अवस्थेत कसा होता याचे दर्शन होणार आहे. गुहेतील आदिमानव काय करीत होता, याची माहिती मिळणार आहे. भाविकांना अश्मयुगीन डायनासोर तसेच विविध जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती पहावयास मिळतील. भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यातील मानव कसा असेल याचे दृश्य पहायला मिळणार आहे.
आणखी पुढे गेल्यानंतर भाविकांना कोलकात्ता येथील दुःख हारीणी देवी यांच्या ज्योतीचे आणि स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना अग्नीपथ पार करून जावे लागणार आहे. त्यापुढे ग्लोबल वाॅर्मिंगमुळे पृथ्वीचे व मानवाचे कसे हाल होणार आहेत याचे दृश्य पहावयास मिळेल. सर्वात शवेटी माताराणीचे दर्शन होणार आहे. यासोबतच चंद्रयान - २ ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
हे दृश्य साकारण्यासाठी हिंगणघाट येथील वास्तू शिल्पकार, चित्रकार, शासनपुरस्कृत कलावंत हरीहर पेंदे हे परीश्रम घेत आहेत. पेंदे यांचे ३०  ते ३५ मजूर अहोरात्र काम करीत आहेत. दुर्गा उत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागही तयारीला लागला आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल राज्यातील कोलकत्ता येथून दुःखहारीणी मंदिरातून ज्योत येणार आहे. भाविकांनी ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-26


Related Photos