महत्वाच्या बातम्या

 लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात चोरी : ६१ हजार ९०५ रुपयांची रोकड लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६१ हजार ९०५ रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता शाळा बंद करून शिक्षक व कर्मचारी घरी गेले होते. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता शाळा उघडण्यात आली असता कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. कार्यालयात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच कपाट आणि टेबलांची तोडफोड झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर शाळेतील विविध टेबल व कपाटांची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. या घटनेत एकूण ६१ हजार ९०५ रुपये चोरीला गेल्याचे समोर आले.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान चोरी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.





  Print






Related Photos