आमदार किशोर जोरगेवार यांचा माता महाकाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प शिंदे सरकार पुर्ण करेल : कॅबिनेट मंत्री संजय राठोड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूरच्या सर्वसमावेशक विकासात पुरातत्व विभाग अडचण ठरत आहे. हि वस्तुस्थिती आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पुरातत्व विभागाच्या अटींबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधत आमदार किशोर जोरगेवार यांचा माता महाकाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पुर्ण करतील असा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
आज पासुन श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोशिएशनद्वारे देण्यात आलेली मातेची चांदीची मुर्ती पालखी मधुन माता महाकाली मंदिरात नेण्यात आली. येथे घटनस्थापना झाली त्यानंतर सदर महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनिल महाकाले, सचिव ॲड. विजय हजारे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सराफा असोशिएशनचे अध्यक्ष भरत शिंदे, नितीन मत्ते, माहुरगडचे देवी भागवत कथा वाचक बाळु महाराज, मनिष महाराज, वंदना हातगावकर, पंकज गुप्ता आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना ना. संजय राठोड म्हणाले कि, शिंदे सरकार स्थापण होताच राज्यातील सण उत्सवावर लादण्यात आलेले निर्बंध सरकाने उठविले. त्यामुळे आज सर्वधर्मीय सण उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित हा महोत्सवात धार्मिक आणि सामाजिक बांधीलकी जपली जात आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देण्यासाठी उत्सवादरम्याण जन्मास येणाऱ्या कन्यांना चांदीचा सिक्का महोत्सव समितीच्या वतीने दिल्या जात आहे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातुनही या महोत्सवात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या महोत्सवात चिंतन मंथन होणार आहे. येथील विकासासाठी पैसा आला मात्र पुरातत्व विभागाची अडचण निर्माण झाली आहे. मात्र हि अडचण दुर करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न असणार असुन यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारशी संपर्क साधतील असे ते यावेळी म्हणाले.
News - Chandrapur