जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटप्रकरणी एसडीपीओ शैलेश काळे निलंबित : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे झालेल्या भुसुरुंग स्फोटप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी  शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले  आहे. शैलेश काळे यांनी योग्य काळजी न घेतल्यामुळेच शीघ्र कृती दलातील १५ जवान मृत्यूमुखी पडले असा आरोप करण्यात येत होता. या निर्णयाबाबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. 
१ मे रोजी  गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा जवळील लेंढारी पुलावर क्युआरटीच्या जवानांचे वाहन  नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट करून उडवून टाकली होती. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते व खासगी वाहन चालक ठार झाला.  
३० एप्रिलला गडचिरोलीतील दादापूर परिसरात नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती. या जाळपोळीची माहिती घेण्यासाठीच हे पथक दादापूरच्या दिशेने रवाना झालं असताना हा स्फोट झाला होता. प्रत्येक क्युआरटी पथकासोबत एक पाहणी पथक देण्यात यावं असा नियम आहे. क्युआरटी पथक येण्याआधी पाहणी पथक कायम सर्व रस्त्यांची पाहणी करत असतं आणि त्यानंतरच नक्षली भागात क्युआरटी पथक कारवाई करण्यासाठी प्रवेश करतं. 
पण १ मे रोजी असं कोणतंही पाहणी पथक देण्यात आलं नव्हतं. गुप्तहेर खात्याने सावध करूनही कोणतीच पाहणी करण्यात आली नव्हती. यामुळेच काळे यांचा निष्काळजीपणाच या स्फोटला काही अंशी जबाबदार असल्याचा आरोप शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी केला होता. या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला होता. या अहवालाच्या आधारेच हे निलंबन करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकरांनी आज विधानसभेत दिली आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos