जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तत्काळ सादर करा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : चालू वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पैकी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागसप्रवर्गातील विद्यार्थी असल्यास त्यांना पुढे आरक्षणांअतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्याकडे प्रवेशापूर्वी जात वैधताप्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आरक्षणार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना व महाविद्यालयाचे प्राचार्यांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागसप्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे सर्व अर्ज भरून घ्यावे. विद्यार्थांनी अर्ज भरून कागदपत्रांसह संबंधित महाविद्यालयात जमा करावे. संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज तत्काळ कार्यालयात सादर करावे.
जे विद्यार्थी १२ वी विज्ञान शाखेत आहेत. त्यांचे अर्ज महाविद्यालयात प्राप्त झाल्यावर महाविद्यालयांनी ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर या कार्यालयात सादर करावे. इतर जिल्हयातील जातीचे प्रमाणपत्र असल्यास संबंधित समितीकडे पाठवावे. विद्यार्थ्यांनी अर्ज www.barti.cvc.in च्या वेबसाईटवर ऑनलाईन भरून सादर करावे. अर्ज भरतांना प्राधान्याने वर्ग १२ वी चे अर्ज प्रथम सादर करावे. त्यानंतर ११ वी चे अर्ज सादर करावे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून सादर करावे. तसेच मानिव दिनांकापूर्वीचे पुरावे नसल्यामुळे कुठलेही खोटेपुरावे प्रस्तावासोबत सादर करू नये. प्रस्तावासोबत सादर करीत असलेले सर्व मुळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे. तसेच मानिव दिनांकापूर्वीचे पुरावे सुध्दा ऑनलाईन अपलोड करावे व प्रस्तावासोबत सादर करावे.
अनुसूचित जातीकरीता १९५० मानिव दिनांक, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग करीता १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता १९६१ मानिव दिनांक आहे. त्यामुळे वाड-वडीलांचे मुळ वास्तव्य असलेल्या ठिकाणीच जातीचे प्रमाणपत्र काढावे व तेथील पडताळणी समितीकडे तपासणीकरीता सादर करावे.
विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत सादर करणे. व सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरीताचे अर्ज प्राप्त करून घेवून समितीकडे सादर करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज न भरल्यास महाविद्यालयांना जबाबदार ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
सर्व प्राचार्यांनी मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज समितीकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी केले आहे.
News - Nagpur