महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी रोव्हर मशिनद्वारे जमीन मोजण्यासाठी आग्रह धरावा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जमीन मोजणीच्या कामात अचूकता व पारदर्शकता यावी, यासाठी रोव्हर मशिनद्वारे जमीन मोजण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. रोव्हर मशिनद्वारे मोजणी केल्यास मानवी हस्तक्षेपाला आळा बसणार असून वेळेची बचतही होणार आहे. रोव्हर मशिनद्वारे जमिनीची मोजणी करतांना अक्षांश व रेखांश जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोव्हरद्वारे जमीन मोजण्यासाठी आग्रह धरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

भंडारा तालुक्यातील मारेगाव येथे रोव्हर मशिनद्वारे जमीन मोजणीच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गजानन धाबेराव, तहसीलदार अरविंद हिंगे, उपअधिक्षक भूमी अभिलेख गौरीशंकर खिची यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब लागायचा. रोव्हर मशीनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साह्याने केली जाणार असल्याने ही मोजणी अचूक असणार असून वेळही वाचणार आहे. भंडारा जिल्ह्यात भूमी अधीक्षक कार्यालयास 14 रोव्हर मशीन प्राप्त झाल्या असून प्रत्येक तालुक्यास 2 रोव्हर मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos