महत्वाच्या बातम्या

 नागपूर विमानतळावर २४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे शारजाहून एअर अरेबिया विमानाने नागपुरात आलेल्या एका भारतीय नागरिकाला अटक करून त्याच्याकडून व्यापार प्रतिबंधित अ‍ॅम्फेटामाइन प्रकारातील २४ कोटींहून अधिक मूल्याचे ३.०७ किलो पदार्थ जप्त केले.

हा व्यक्ती केनियातल्या नैरोबी येथून शारजा, यूएईमार्गे नागपुरात आला होता.

डीआरआयने माहिती ठेवली गुप्त : 

या भारतीय नागरिकाला रविवारी ताब्यात घेण्यात आल्यानंतर कारवाईची माहिती गुप्त ठेवून या प्रकरणाशी संबंधित एका नायजेरियन नागरिकाला २१ ऑगस्टला पश्चिम दिल्लीच्या सुभाषनगर परिसरातून अटक केली. या नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता. भारतीय व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली. शिवाय सर्व प्रक्रिया पूर्ण करून नायजेरियन नागरिकाला बुधवारपर्यंत नागपुरात आणण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आयताकृती पुठ्ठ्याच्या खोक्यात लपविला होता अंमली पदार्थ : 

शारजाहून एअर अरेबियाच्या क्रमांक जी९-४१५ विमानाने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाने त्याच्या वैयक्तिक सामानात ठेवलेल्या आयताकृती पुठ्ठ्याच्या खोक्यात वेष्टित पोकळ धातूच्या रोलरमध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवला होता. अ‍ॅम्फेटामाइन हा अंमली औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणार पदार्थ कायदा, १९८५ च्या अनुसूची ह्यआयह्ण अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक (व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा) पदार्थ असून त्याचा व्यापार प्रतिबंधित आहे.

यूएईमध्ये गेलेल्या भारतीय नागरिकांनी एअर एरेबियाच्या विमानातून पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी केल्याची अनेक प्रकरणे आहेत. अनेकांना नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पण रविवारी शारजाहून विमानाने नागपुरात अंमली पदार्थ आणलेल्या भारतीय युवकाला अटक केल्याचे पहिलेच प्रकरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos