माजरी रेल्वे स्थानकावर ग्रॅनाइटच्या फरशीने डोक्यावर वार : दोघांना एका दिवसात ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : माजरी रेल्वे स्थानक परिसरात एका इसमाच्या डोक्यावर ग्रॅनाइटच्या फरशीने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी अवघ्या एका दिवसात ताब्यात घेतले. जीआरपी वर्धा, एलसीबी जीआरपी नागपूर आणि आरपीएफ चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, माजरी रेल्वे स्थानकावर दोन अज्ञात इसमांनी एका व्यक्तीच्या डोक्यावर ग्रॅनाइटच्या फरशीने वार केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमीला उपचारासाठी वरोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे, वर्धा येथे गुन्हा क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. जीआरपी वर्धा, एलसीबी जीआरपी नागपूर आणि आरपीएफ चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने चंद्रपूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून संशयितांचा शोध घेतला.
या कारवाईत आरोपी सिद्धेश अमित राऊत (वय २९), रा. सुमित्रानगर, चंद्रपूर आणि सचिन बाबूलाल दूधगवली (वय ३६), रा. येनसा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनीही या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे माजरी रेल्वे स्थानकावरील हल्ल्याचा गुन्हा उघडकीस आला.
ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे, जीआरपी नागपूरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी जीआरपी नागपूरचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पंजाबराव डोळे, जीआरपी वर्धाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे आणि चंद्रपूर आरपीएफ चे ठाणेदार बलवीर सिंह यांच्या नेतृत्वात जीआरपी वर्धाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, पोलीस शिपाई अखिलेश चौधरी, एलसीबी जीआरपी नागपूरचे हेड कॉन्स्टेबल उमेश भुरले व त्यांची टीम, तसेच आरपीएफ चंद्रपूरचे सहाय्यक उपनिरीक्षक सचिन नागपुरे आणि आरक्षक सुमित यांनी केले.




Petrol Price




