महत्वाच्या बातम्या

 विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरला अटक


- गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप; दवाखान्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे व सर्जिकल साहित्य आढळले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा-वडगाव परिसरातील मयुरी हरिदास सुपारे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप असलेल्या डॉ. विष्णू महानंद विश्वास याला पोलिसांनी अखेर रविवारी अटक केली. यापूर्वी या प्रकरणात मृत महिलेच्या पतीलाही पोलिसांनी अटक केली होती.

मयुरी सुपारे यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत शेगाव (बु.) येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. या आरोपांनंतर शेगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

संयुक्त पथकाची दवाखान्यावर छापेमारी -
तपासादरम्यान महसूल, पोलीस, आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शेगाव (बु.) येथील डॉ. विष्णू महानंद विश्वास यांच्या दवाखान्यावर छापा टाकून तपासणी केली.

या कारवाईत दवाखान्यातून विविध प्रकारची औषधे, इंजेक्शने, सलाईन, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि काही प्रतिबंधित स्वरूपाच्या औषधांचा साठा आढळून आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली. याशिवाय औषधी साठा, वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सचीही तपासणी करण्यात आली.

तपासादरम्यान डॉक्टर फरार -
दवाखान्यावर झालेल्या कारवाईनंतर पोलिसांकडून संबंधित डॉक्टरचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, तपासाच्या काळात डॉ. विष्णू विश्वास फरार झाल्याचे समोर आले.

दरम्यान, डॉक्टरने अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत रविवारी डॉक्टरला अटक केली.

अटकेनंतर तपासाला वेग -
डॉक्टरच्या अटकेनंतर मयुरी सुपारे यांच्या आत्महत्येचा गर्भपाताच्या कथित प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या का, तसेच दवाखान्यातील औषधे व वैद्यकीय साहित्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

तसेच दवाखान्यात आढळलेल्या औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल साहित्याची कायदेशीरता तपासली जाणार आहे. संबंधित डॉक्टरच्या वैद्यकीय पदवीची वैधताही तपासली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्य बाबींचा उलगडा होण्याची शक्यता -
डॉक्टरच्या अटकेमुळे आत्महत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी, नातेवाईकांचे आरोप, दवाखान्यात आढळलेला औषधी साठा आणि वैद्यकीय साहित्य या सर्व बाबींचा तपासाच्या दृष्टीने बारकाईने विचार केला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती शेगाव (बु.) पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेंद्र यादव यांनी दिली. डॉक्टरच्या अटकेनंतर आता तपासातून नेमके कोणते तथ्य समोर येते आणि या प्रकरणातील इतर संबंधितांची भूमिका काय होती, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos