गोवरी-पोवनी कोळसा खाणीतून एक टन लोखंडी भंगार चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलीच्या गोवरी-पोवनी कोळसा खाणीतील चेकपोस्ट परिसरात चार वर्षांपासून बंद असलेल्या वजनकाट्यावरील सुमारे एक हजार किलो लोखंडी भंगार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. वजनकाट्यावरील लोखंडी प्लेट्स, गर्डर आणि चॅनेल असा एकूण एक टन लोखंडी माल अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी वेकोलीच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गोवरी-पोवनी कोळसा खाणीतील चेकपोस्टवर कोळशाचे वजन करण्यासाठी वजनकाटा बसविण्यात आला होता. मात्र, वापरात नसल्याने हा वजनकाटा मागील चार वर्षांपासून बंद होता. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा प्रहरी तैनात करण्यात आले नव्हते. तसेच चेकपोस्टच्या आजूबाजूला झुडपी जंगल असल्याने परिसरात नियमित देखरेख होत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी वजनकाट्यावरील लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी वजनकाट्यावरील लोखंडी साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये २०० किलो वजनाच्या दहा लोखंडी प्लेट्स, ६०० किलो वजनाचे दोन लोखंडी गर्डर आणि २०० किलो वजनाचे सात लोखंडी चॅनेल यांचा समावेश आहे. या साहित्याचे एकूण वजन एक हजार किलो असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर वजनकाट्याजवळ शिल्लक असलेले लोखंडी साहित्यही चोरीला जाऊ नये, यासाठी ते काढून वेकोलीच्या स्टोअर रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. बंद वजनकाटा आणि परिसरात सुरक्षा प्रहरी तैनात नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने लोखंडी भंगार चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणी कोळसा खाण परिसरातील बंद यंत्रसामग्री आणि भंगार साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




