गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे साहेबांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्या आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सेवा विचारात घेऊन त्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही विनंती केली.
यासोबतच जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे, दुर्गम भागातील शाळांच्या अडचणी, शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांची माहिती मंत्री महोदयांना दिली.
मा. मंत्री महोदयांनी नुकत्याच केलेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान शैक्षणिक समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन विविध सूचना व निर्देश दिले होते. त्या सर्व निर्देशांची तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करून जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व शाळांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक निर्णय शासन स्तरावर तातडीने घेण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.




Petrol Price




