शेतक-यांनो, रब्बी ज्वारीच्या प्रमाणित बियाण्यांवर ५० टक्के अनुदान : महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान-पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२०२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारीच्या प्रमाणित बियाण्यांचे ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिकिलो ३० रुपये, तर दहा वर्षांवरील वाणांसाठी प्रतिकिलो १५ रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिके या घटकांतर्गत शेतकरी गटांना बियाणे घटकाचा लाभ १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.
या दोन्ही घटकांचे लक्षांक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वितरणासाठी, तर पात्र शेतकरी गटांनी पीक प्रात्यक्षिकांसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
विविध कृषी उपक्रमांचाही लाभ -
पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण आणि जिल्हास्तरीय कृषी महोत्सव यांसारखे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन -
रब्बी हंगामात जास्तीत जास्त पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टल वरील Farmer Login या पर्यायातून ऑनलाइन अर्ज करून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक संगीता माने यांनी केले आहे.




Petrol Price




