कमलापूरच्या प्रा.सत्यनारायण पुसाला यांना प्राणिशास्त्रात डॉक्टरेट संतोष ताटीकोंडावार यांच्याकडून शुभेच्छा!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : निसर्गाच्या कुशीत वसलेले,आदिवासी संस्कृतीचा आणि समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभलेले माझे मूळगाव कमलापूर हे आजपर्यंत राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प,दुर्मिळ रानम्हशींचे अस्तित्व,गिधाडांचे संवर्धन आणि घनदाट जंगलासाठी ओळखले जात होते.आता याच कमलापूर गावाने शैक्षणिक क्षेत्रातही इतिहास घडवला असून,संपूर्ण अहेरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गावातीलच होतकरू आणि जिद्दी युवक,आमच्या गावाचे सुपुत्र प्रा.सत्यनारायण पुसाला यांनी गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथून प्राणिशास्त्र (Zoology) विषयात पीएच.डी.(आचार्य) पदवी संपादन करून कमलापूर गावाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
ही बाब केवळ एका व्यक्तीची पदवी नाही,तर संपूर्ण कमलापूर गावासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे.कारण, कमलापूर गावातील पहिले एम.एस्सी.पदवीधर होण्याचा मान यापूर्वीच प्रा.सत्यनारायण पुसाला यांनी मिळवला होता,आणि आता गावातील पहिले डॉक्टरेटधारक (पहिले डॉ.) होण्याचा दुहेरी बहुमानही त्यांनीच पटकावला आहे.त्यामुळे गावाच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा,सुवर्णिम अध्याय लिहिला गेला आहे.
डॉ.सत्यनारायण पुसाला यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.दुर्गम,आदिवासीबहुल भाग,आर्थिक अडचणी,शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींवर त्यांनी मात केली आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कमलापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या श्री गुरुदेव आश्रमशाळेतून झाली.आश्रमशाळेतील शिक्षणाचे संस्कार,शिस्त आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षणाची वाटचाल यशस्वी केली.जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दुर्गम भागातूनही उच्च शैक्षणिक शिखर गाठता येते,हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
डॉ.पुसाला यांनी केलेले संशोधन हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून, ते पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यांच्या संशोधनाचा विषय मध्य भारतातील कॅटफिश जैवविविधता,डीएनए बारकोडिंग आणि आण्विक वंशविकास (Molecular Phylogeny) असा होता. आधुनिक आण्विक तंत्रज्ञानाचा (Molecular Technology) वापर करून त्यांनी मध्य भारतातील माशांच्या प्रजातींचा अभ्यास केला.या संशोधनासाठी त्यांना डॉ.मंदार एस.पैगणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,तसेच प्रा.नरेंद्र अरेकर,सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवाराचे सहकार्य मिळाले.
सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित मोहसीनभाई झवेरी महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथे प्राणिशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून,नव्या पिढीला ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून,गडचिरोलीसारख्या मागास आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरणारे आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्या भावनिक शुभेच्छा -
यावेळी बोलताना संतोषभाऊ ताटीकोंडावार म्हणाले,माझ्या मूळगाव कमलापूरचा सुपुत्र आज डॉक्टर झाला,याचा मला सार्थ अभिमान आहे.ज्या गावाच्या मातीत मी लहानाचा मोठा झालो,ज्या गावाने मला ओळख दिली,त्याच गावातील एका युवकाने आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करून डॉक्टरेट मिळवली,ही माझ्यासाठी आणि प्रत्येक कमलापूरकरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
जंगल,हत्ती आणि आदिवासी संस्कृतीसाठी ओळख असलेल्या आमच्या कमलापूरला आता डॉक्टरेटचीही ओळख मिळाली आहे.डॉ.सत्यनारायण पुसाला यांनी गावाची मान उंचावली आहे.त्यांच्या या यशामुळे कमलापूरच्या नव्या पिढीला निश्चितच उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.त्यांच्या या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून,कमलापूरसह संपूर्ण अहेरी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.




Petrol Price




