महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू


- गोंदिया-बालाघाट मार्गावरील मोहरानटोलीजवळ अपघात; ग्रामीण पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावर भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी २६ सकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ग्राम मोहरानटोलीजवळील विनायक धर्मकाट्याजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेचे नाव संजुबाई ऊर्फ संचिता भीमराव वासनिक ५५, रा. सावरीटोला असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संचिता वासनिक या गोंदियाहून बालाघाटकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होत्या. दरम्यान, अज्ञात वाहनचालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात संचिता वासनिक गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे मार्गावर काही काळ खळबळ उडाली.

या प्रकरणी सुशील मेथी कोल्हाटकर ४३, रा. सावरीटोला यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ), (ब) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.





  Print






Related Photos