महत्वाच्या बातम्या

 रेल्वे कामाच्या ठिकाणावरून १.३२ लाखांचे साहित्य चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोर्ला व नवरगाव परिसरातील रेल्वे लाईनच्या कामाच्या ठिकाणावरून तब्बल १ लाख ३२ हजार २१४ रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. चोरीचा प्रकार २ सप्टेंबरच्या रात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेमुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोर्ला व नवरगाव परिसरात झांझरिया निर्माण लिमिटेड कंपनीमार्फत पादचारी पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामासाठी आवश्यक असलेले विविध साहित्य कामाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी कामाचे ठिकाण निर्मनुष्य असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी साहित्यावर डल्ला मारल्याचे सांगण्यात येत आहे.

२ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी कामाच्या ठिकाणी प्रवेश करून जनरेटरची बॅटरी, पाईप, लोखंडी सळ्या, प्लायवूड कटींग मशीन आदी साहित्य चोरून नेले. सकाळी कामगार किंवा संबंधित कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतर साहित्याची पाहणी केली असता काही साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १ लाख ३२ हजार २१४ रुपये असल्याचे समोर आले. ४ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी चोरीची माहिती दिली.

या घटनेमुळे रेल्वे लाईनच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे साहित्य ठेवताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी नेमके कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि चोरीचे साहित्य कुठे नेले, याचा तपास सुरू आहे. परिसरातील उपलब्ध माहिती व पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





  Print






Related Photos