शाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता


- माध्यान्ह भोजन योजनेत साहित्य पुरवठादाराकडून होतेय शासनाची दिशाभूल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विद्यार्थ्यांना योग्य पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांठी माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. शासनाचा उद्देश योग्य असला तरी ही योजन राबविणारी यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. शालेय पोषण आहाराचे साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाचे मीठ पुरवठा करण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुरवठादाराकडून शासनाची दिशाभूल होत असून पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 
शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेत टाॅप लाईन नामक कंपनीचे मीठ पुरविण्यात आले आहे. हे मीठ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळून न जाता कपडे धुण्याच्या पावडरसारखे फेस येत आहे. तसेच मीठ गाळासारखे बुडाला बसत आहे. यामध्ये काळपट रंगाचे बारीक कण आढळून आले आहेत. जेवन तयार झाल्यानंतर भाजीचा रंगसुध्दा काळपट दिसून येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. पुरवठा करण्यात आलेले मीठ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. 
मीठाच्या पुड्यावर ‘शक्ती आणि बुध्दीचा रक्षक’ असे वाक्य नमुद करण्यात आले आहे. मात्र हे मीठ पाहिल्यानंतर खरेच शक्ती आणि बुध्दीचा रक्षक आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. करोडो रूपये खर्च करून शासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी योजना राबवित आहे. योजना राबविण्यासाठी खासगी पुरवठादारांची मदत घेतली जाते. मात्र या पुरवठादारांकडून मलिंदा लाटण्यासाठी निकृष्ट साहित्य पुरविण्यात येत आहे. अनेक शाळांमध्ये पुरवठा केले जात असलेले साहित्य निकृष्ट आढळून आल्याची बाब याआधीसुध्दा समोर आली आहे. यामुळे अशा बोगस साहित्य पुरवठादारांवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-28


Related Photos