महत्वाच्या बातम्या

 महामार्गालगतच्या आयडियल स्कूलला पर्यायी प्रवेशद्वार द्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रवेशद्वार राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना महामार्गाच्या विरुद्ध दिशेने ये-जा करावी लागत असून, या मार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक पाहता भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे बल्लारपूर शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी १२ सप्टेंबर रोजी शाळा प्रशासनाला निवेदन देत महामार्गाच्या विरुद्ध दिशेला पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्याची मागणी केली.

आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची वाढती ख्याती आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विवेकानंद वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, विद्यानगर वॉर्ड, शिवनगर वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड, गोकुळनगर वॉर्ड तसेच इतर परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येतात. महामार्गालगत फुटपाथची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी महामार्गावर पिकअप वाहनाने अनेकांना धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली होती. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले, तर एका मेडिकल संचालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षेबाबतची चिंता अधिक वाढली आहे.

शाळेला पर्यायी प्रवेशद्वार देण्याबाबत शहराध्यक्ष उमेश कडू यांनी यापूर्वीही शाळा प्रशासन तसेच बल्लारपूरचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मौखिक स्वरूपात मागणी केली होती.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर पालकांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने तातडीने पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.





  Print






Related Photos