रानटी हत्तींच्या हैदोसामुळे नागणडोह ग्रामस्थ चिंतेत
- हत्तीचे कळप आता गडचिरोली वनक्षेत्रात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यतील नागणडोह येथे रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. घरांची नासधूस, अन्नधान्य आणि जीवनपयोगी साहित्य नष्ट झाले. एवढेच नव्हेतर जीव वाचविण्याच्या नादात आम्ही आणि पाळीव जनावरे सैरावैरा झालो. मागील दोन दिवसांपासून अंगावर घातलेल्या कापडावर तुमच्याच आश्रयाने शाळेत दिलेल्या जागी कसे बसे दिवस काढत आहोत. मात्र, आता पुढचा संसाराचा गाडा हाकायचा कसा? असा प्रश्न नागणडोह वासीयांनी उपस्थित केला आहे.
१२ ऑक्टोबरच्या रात्री रानटी हत्तींच्या कळपाने नागणडोह पाळ्यात अचानक हल्ला करून उपद्रव घातला. येथील ९ कुटुंबातील ३० ते ३५ लोकांनी जीव मुठीत घेवून मध्यरात्री जंगलातून प्रवास करीत बोरटोला, तिरखेडी गाव गाठले, तर दुसरीकडे हत्तीच्या हल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी पाळीव प्राण्यांना मोकाट सोडण्यात आले. त्यामुळे पाळीव प्राणीदेखील सैरावैरा झालेत. एवढेच नव्हेतर, लहान जनावरे हत्तींचे बळी ठरले. हत्तींनी घरांची नासधूस करीत अन्नधान्यासह इतर जीवनपयोगी साहित्य नष्ट केले. आजघडीला नागणडोहवासी वनविभागाच्या आश्रयात बोरटोला येथे शाळेत राहत आहेत. मात्र, पाड्यात पुन्हा परत गेल्यावर जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंगावर असलेल्या कापडावर लहान मुलांपासून गरोदर माता व वृद्ध कसेबसे दिवस काढत आहेत. आता संसाराचा गाडा कसा हाकायचा? अशी चिंता नागणडोहवासीयांना सतावू लागली आहे. प्रशासनाकडूनही ते पुनर्वसनाची अपेक्षा करीत आहेत.
वनविभागाच्यावतीने भरनोली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या अवघ्या ३० ते ३५ लोकसंख्या असलेल्या नागणडोह या पाड्याला पुनर्वसनाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र तेथील नागरिकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नागणडोह पाड्यातील नागरिकांना उपेक्षितांचे जीवन जगणे पसंतीचे होते. मात्र, हत्तींच्या उपद्रवामुळे आणि वन्यप्राण्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे आता नागणडोह ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.
हत्तीचे कळप गडचिरोली वनक्षेत्रात
अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून संचार करीत असलेला हत्तीचा कळप आता गडचिरोली वनक्षेत्रात परतला आहे. वनविभागाने हत्तींच्या कळपाला लावले. शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या अवघ्या १० किमी अंतरावरील गडचिरोली जिल्ह्याच्या वनक्षेत्रात हत्तींचा कळप गेला असल्याचे वनविभागाने सांगितले. असे असले तरी हा कळप पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या दिशेने वळू शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे.
News -