कमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात


- तीन दिवसांपासून सात ते आठ गावांचा संपर्क खंडीत 
- रूग्णांसोबतच कुटूंबीयांचेही हाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यातील पुलांच्या कमी उंचीमुळे पावसाळ्याच्या दिवसात समस्यांचा डोंगरच उभा ठाकतो. यामुळे नागरिकांचे हाल होतात. आधीच आरोग्य सेवेची वानवा असलेल्या तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात रूग्णांना रूग्णालयात नेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. पावसामुळे कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेले. यामुळे गंभीर रूग्णाला तीन फुट पाण्यातून खोटेवरून रूग्णालयात नेण्याची पाळी आली.   आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे  रूग्णाचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. 
तालुक्यातील आरेवाडा येथील दुगू बंडू पुसाली (५६) या महिलेला अस्थमा रोगाने ग्रासले होते. तिला १२ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिचा त्रास वाढल्याने प्रथमोपचारानंतर ग्रामीण रूग्णालयात हलविणे आवश्यक होते. पाऊस कोसळत होता. नदी - नाले तुडूंब भरले. तालुक्यातील सर्वच मार्ग कमी उंचीच्या पुलामुळे अडले होते. यामुळे तिला रूग्णालयात न्यायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला. आरेवाडा येथून येताना पडणाऱ्या नाल्याच्या पुलावरून ३  फुट पाणी होते. अशाही परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक पिंटूराज मंडलवार, औषधी निर्माता विलास समर्थ, आरोग्य सेविका सपना कुमरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रूग्णाला खांद्यावर घेवून ५०० मीटर अंतर पाण्यातून पार केले. यानंतर पिंटूराज मंडलवार यांनी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलावून भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात पोहोचविले. आता रूग्णाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. विशेष म्हणजे पिंटूराज मंडलवार यांची रूग्णसेवेमुळे वाहवाहकी होत आहे. 
भामरागड तालुक्यातील कमी उंचीच्या पुलामुळे या तालुक्याचा जगापासून संपर्क तुटतो. पुलांच्या उंचीचा प्रश्न दरवर्षी उपस्थित होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला नानाविध संकटे सोसावी लागत आहेत. प्रसंगावधान राखून रूग्णांना वेळेवर पोहचवू न शकल्यास येथील गंभीर आजारी रूग्णांना प्राण गमावण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे तालुक्यातील जनतेच्या प्रमुख समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-14


Related Photos