महत्वाच्या बातम्या

 एसडीओ कार्यालयावर धडकला शेतकरी-कष्टकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा


- धानाला बोनस, सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्या; बैलगाड्या व ट्रॅक्टरसह शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि निराधारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मंगळवारी ८ ब्रह्मपुरी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारक, वडसा रोड येथून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांसाठी शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने मोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

किसान सभा जिंदाबाद, शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण ब्रह्मपुरी शहर दणाणून गेले. शेतकरी नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी बैलगाड्या व ट्रॅक्टरसह मोर्चात सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शाहिरी जलशातून शासनाच्या धोरणांवर प्रहार -
मोर्चादरम्यान अमरावतीचे कॉ. धम्मा खडसे आणि गडचिरोलीचे लोकशाहीर विजय शेंडे यांच्या शाहिरी महाजलशाचे आयोजन करण्यात आले. शाहिरीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. या कार्यक्रमामुळे आंदोलकांमध्ये नवा उत्साह संचारला.
मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी जगदीश मेश्राम, अ‍ॅड. आशिष गोंडाने, प्रशांत डांगे आणि जीवन बागडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या -
आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. त्यामध्ये पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बोनस देण्यात यावा.
शेतीसाठी नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा.
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी.
जबरानजोत धारकांना त्यांच्या जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.
शेतातील स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात यावी.
वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसह मानवी जीविताला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे रखडलेले मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे.


प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी -

शेतकरी आणि कष्टकरी वर्गासमोर वाढता उत्पादन खर्च, अपुरा हमीभाव, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आणि वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान यांसारखी अनेक संकटे उभी आहेत. त्यामुळे शासनाने केवळ आश्वासने न देता या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मोर्चाच्या शेवटी नायब तहसीलदार बोबाटे यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. शासनाने मागण्यांची दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.





  Print






Related Photos