नवकल्पनांसह नवउद्योजकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी विपीन इटनकर
- स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा १४ ऑक्टोबर पासून
- जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वतीने ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यामध्ये प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र होणार आहेत. इच्छुक युवक, युवतींनी आणि नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
ग्रामीण, दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नावीण्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, त्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे असा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेचा दुसरा टप्प्यात १४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण उर्सुला गर्ल्स हायस्कुल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
त्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी, ऊर्जा, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता आदी क्षेत्रांतील नव्या व्यवसाय संकल्पनांवर दहा मिनिटांचे सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यातून तज्ज्ञ समितीकडून जिल्हास्तरावर तीन विजेते घोषित केले जाणार असून त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरणासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक-युवती व नावीन्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी राज्य नावीन्यता सोसायटीच्या www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी व शिबीरास उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांच्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा दुरध्वनी क्र. ०७१२-२५३१२१३ वर संपर्क साधावा.
News - Nagpur