ब्रम्हपुरीत अवैध देशी दारू वाहतुकीवर एलसीबीचा छापा : ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अवैध देशी दारूसह दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
८ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुडेसावली परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी कारमधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४० पेट्यांमध्ये ९० मिली क्षमतेच्या एकूण ४ हजार सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किमतीची फोर्ड फिगो कार क्रं एमएच ३१ बीके ९२४२ जप्त करण्यात आली.
या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ७०१/२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुनिल रमेश नरुले आणि विपुल तानाबा मेश्राम, दोघेही रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हरभजनसिंग सतनामसिंग हा पाहिजे आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सुनील आत्राम, जयंत चुनारकर, संतोष, पोअं अजित बरडे यांनी केले.




Petrol Price




